प्रतिनिधी/ मावळातील ऐतिहासिक तिकोना किल्ल्यावर खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून आणि आपला मावळा व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकारातून गड संवर्धन, स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम उत्साहात पार पडली. मुसळधार पावसातही हजारो शिवप्रेमींनी किल्ला सर करत मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या मोहिमेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती लाभली.
खा. लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दर महिन्याला एक गड उपक्रमांतर्गत तिकोना हा पाचवा गड ठरला. पुणे, मुंबई, नगर जिल्ह्यातील मावळयांसह राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथून आलेल्या विद्यार्थ्यांनीही मोहिमेत सहभाग नोंदविला. विशेषतः नगर शहरातील ५५ विद्यार्थीनींनी मोहिमेच्या प्रारंभी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली.
शनिवारी रात्रीच खा. लंके व ४०० मावळे गडाच्या परिसरात मुक्कामी पोहचले होते. मोहिमेला शिवप्रतिज्ञा आणि जिजाऊ वंदनेने प्रांरभ झाला. पावसाच्या अडथळयांची पर्वा न करता मावळयांनी गडावर स्वच्छता, झाडांचे संवर्धन, डस्टबिन्स लावणे, वीज तसेच सूचना फलकांची व्यवस्था ही कामे पार पाडली.
खा. लंके खरं हिंदुत्व मांडत आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच खा. नीलेश लंके हे संपूर्ण महाराष्ट्रात गडसंवर्धनाचे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले आठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे खरं हिंदुत्व ते कृतीतून जनतेसमोर मांडत आहेत.
आ. जयंत पाटील
मा. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी
खा. लंके यांच्याकडून लोकसहभागातून संवर्धन
तिकोना गडावर येणं हे भाग्य आहे.दिल्लीश्वरांना ही हिंमत झाली नाही. गडकिल्ले वाचविण्यासाठी शासनाची मदत मिळाली नाही तरी खा. नीलेश लंके हे लोकसहभागातून गडसंवर्धन करत आहेत. या गडाच्या संवर्धनाचा १० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वनविभागाच्या हद्दीतील पायऱ्यांच्या दुरूस्तीसाठी ४० लाखांच्या प्रस्तावासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
शशीकांत शिंदे
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
गड ही आपली प्रेरणास्थानं
या मोहिमेत कोणताही पक्ष वा पद नाही. सर्व जाती, धर्माचे तरूण या मोहिमेत सहभागी होत आहे. मुस्लीम समाजाचे १०० हून अधिक मावळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गड ही आपली प्रेरणास्थानं आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी सरकारपेक्षा आपणही पावले उचलायला हवीत. या मोहिमेद्वारे गड किल्ल्यांचे महत्व, त्यांचे ऐतिहासिक स्थान, आणि शिवकालीन वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
