गुरूमंदिर आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांना ७२३ कोटींची मंजुरी

प्रतिनिधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील गुरूमंदिर तीर्थक्षेत्रासाठी १७० कोटी आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी ५५३ कोटी, अशा एकूण ७२३ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामविकास, पर्यटन आण‍ि संबंधित विभागांनी सुधारित नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले.  प्रस्ताव सादर करताना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन कमी खर्चात उच्च दर्जाची कामे करावीत आणि परिसराचे महत्त्व ओळखून सर्वसमावेशक प्रस्ताव जिल्ह्यांकडून सादर व्हावेत, असे स्पष्ट केले. तीर्थक्षेत्र विकास हे धार्मिक पर्यटनासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीही महत्त्वाचे असल्याने त्यांची योजना करताना सामाजिक आणि आर्थिक घटकांचा विचार करावा असे नमूद करून मान्यता मिळालेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, तसेच नवनिर्मित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रभावी देखरेख ठेवावी, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत नागपूर येथील महत्त्वपूर्ण प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये नंदनवन ले-आऊट येथील लक्ष्मीनारायण आणि शिव मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि पुनर्विकास, भांडेवाडी येथील श्री मुरलीधर मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास, शांतीनगर येथील इतवारी रेल्वे स्टेशनजवळील कुत्तेवाला आश्रमाच्या सुशोभीकरणाचा  समावेश आहे.

या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार संजय देशमुख, आमदार सईताई प्रकाश डहाके, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने