प्रतिनिधी - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या ५ टक्के निधीतून दिव्यांगांना देण्यात येणारा लाभ हे मासिक वेतन नसल्याने या दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेता येईल असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात खा .नीलेश लंके यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पाठपुरवा केला होता.
महानगरपालिकेकडून देण्यात येणारा ५ टक्के राखीव निधीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देता येणार नाही अशी भूमिका महसूल विभागाने घेतल्यानंतर नीलेश लंके अपंग कल्याणकारी संस्थेचे प्रमुख सुनील करंजुले यांनी यासंदर्भात खा. नीलेश लंके यांचे लक्ष वेधले होते.
महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग, अपंगांना केंद्र शासनाच्या हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दारिद्रय, निर्मुलन, उपकरणे खरेदी तसेच वैयक्तिक लाभासाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतुद आहे. महसूल विभागने दिव्यांगाना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ नाकारल्यानंतर खा. लंके यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार करून ५ टक्के राखीव निधीचा लाभ कुठल्याही प्रकारचा नियमित मासिक आर्थिक लाभ नसून तो केवळ अपंग, दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभासाठी व उपकरणे खरेदीसाठी, दारिद्रय निर्मुलनासाठी देण्यात येत असल्याने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिव्यांगाना मिळाला पाहिजे अशी भूमिका खा. लंके यांनी मांडली.
खा. लंके यांनी यासंदर्भात मागणी केल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांनीही दिव्यांगांना नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याचे पत्र महसूल विभागाला दिले त्यानंतर दिव्यांगांच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
