गर्भगिरीच्या पर्वत रांगेतील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ संजीवनी समाधी दर्शन गुढीपाडव्यानिमित्त खुले

प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गर्भगिरीच्या पर्वतरांगेतील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव (मायंबा) येथे नवनाथांपैकी एक असलेले मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी असुन गुढी पाडव्याच्या फाल्गुनी अमावस्याच्या रात्री म्हणजेच शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी दर्शनासाठी खुली करण्यात आली. वर्षभरातून फक्त एकदाच फाल्गुनी अमावस्येला संजीवनी समाधीवर भाविकांना सुगंधी चंदनलेप, चंदन उटी लेप लावण्याचा कार्यक्रम असतो. भारताच्या काना कोपऱ्यातुन आलेले लाखो नाथभक्त आंघोळ करत दर्शन घेतात. यावेळी मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने भाविकांचे सुलभ दर्शनासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.

 नवनाथांपैकी आद्यनाथ समजल्या जाणाऱ्या चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव (मायंबा) येथे आहे. गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाला मोठा अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी येथे संजीवन समाधी घेतलेली असून वर्षातून फक्त एकच दिवस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य अमावास्येला रात्री या समाधीवरील भरजरी भगवे वस्त्र बाजूला काढून समाधीला मंगलस्नान घालून महापूजा केली जाते.

यंदा देखील शनिवार दिनांक 29 मार्च रोजी सूर्यास्त ते गुढीपाडव्याच्या सूर्योदयापर्यंत हा सोहळा चालू होता. यानिमित्त देशभरातून लाखो भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवारी सूर्यास्तानंतर रात्री नऊ वाजता भाविकांनी पैठण येथून आणलेल्या गंगाजलाने समाधीस जलाभिषेक घालण्यात आले.कावडी स्नानानंतर विविध प्रकारच्या दुर्मिळ सुगंधी द्रव्यांनी समाधीवर उटणे,लेप लावले गेले. मंदिरामध्ये हा सोहळा पूर्णतः मशालीच्या उजेडात सुरू होता. तसेच समाधीला स्पर्श करण्यासाठी भाविकांना स्नान करून ओल्या वस्त्रानिशी येणे बंधनकारक केले होते. या सोहळ्यासाठी महिलांना परवानगी नसून पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही कटाक्षाने पाळली जाते. 

महास्नान व महापूजा सुरू असताना रात्रभर देवस्थान परिसर नगारे, डफ व शंखध्वनीच्या निनादाने दुमदुमून गेलेले पहावयास मिळाले. भाविक "सदगुरू बडे बाबा महाराज की जय'चा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. पहाटे महाआरती होऊन सूर्योदयापूर्वी समाधीवर पुन्हा नवे भरजरी भगवे वस्त्र टाकून समाधी झाकली गेली. गुढीपाडव्याला देखील भाविक दिवसभर दर्शनासाठी गर्दी करतात. 

वर्षातून एकदाच होणाऱ्या या सोहळ्यासाठी भारतभरातून भाविक भक्त याठिकाणी उपस्थित होता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने