पाणी प्रश्नावर विखे कुटुंबाने पन्नास वर्षे झुलवत ठेवले- तरटे

संघर्ष मराठी २४ न्युज

पारनेर, प्रतिनिधी - गेल्या चाळीस वर्षांपासून विखे कुटुंबाने पारनेर तालुक्यातील जनतेला पाण्याच्या प्रश्नावर झुलवत ठेवले.विकासाऐवजी तालुक्यात गट तटाचे राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेतली.असे घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे यांनी केले.पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे या पिता पुत्रांना लोकसभा निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नाही,असे तरटे म्हणाले.

        पालकमंत्री विखे यांनी निघोज (पारनेर) येथील कार्यक्रमात बोलताना,खासदार नीलेश लंके दडपशाहीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला.तालुक्यातील माफिया राज रोखण्यासाठी महायुतीला पाठबळ देण्याचे आवाहन विखे यांनी केले होते.विखे यांनी केलेल्या आरोपांचा तरटे यांनी माध्यमांशी बोलताना समाचार घेतला.

      तरटे म्हणाले की, पालकमंत्री विखे यांचे वडील, तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांनी कुकडी प्रकल्पातील पाण्याचे अमिष दाखवत पारनेर तालुक्यातील जनतेच्या जीवावर चाळीस वर्षे सत्ता उपभोगली,विकासाच्या भूलथापा दिल्या.माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनीही विकास कामांना प्राधान्य देण्याऐवजी गावागावात भांडणे लावण्याचे काम केले.त्याऐवजी केंद्रातील सत्तेचा वापर करून एखादे भरीव काम केले असते तर तालुक्यातील जनता त्यांची ऋणी राहिली असती.पारनेर तालुक्यातीलच नव्हे तर दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने विखे पिता - पुत्रांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.त्यामुळे सैरभैर झालेल्या विखे पिता पुत्रांना जळी स्थळी खासदार लंके दिसत आहेत.विखेंच्या साम्राज्याला सुरूंग लागल्याने निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेतून पालकमंत्री विखे यांच्याकडून खासदार लंके यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे तरटे म्हणाले.

      वास्तविक पाहता विखे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.राज्यापुढे असलेल्या अनेक गंभीर समस्या, विकास प्रकल्प आदी बाबींवर मार्ग काढण्याची काही प्रमाणात जबाबदारी विखे यांच्यावर आहे.मात्र त्यांची ती पात्रता नसावी.असा खोचक टोला तरटे यांनी लगावला.खासदार लंके यांच्यावर नाहक आगपाखड करण्याऐवजी राज्यापुढील तसेच राज्यातील सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विखे यांनी प्रयत्न केले तर ते अधिक उचित ठरेल असे तरटे म्हणाले.

निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत.या पार्श्वभूमीवर महायुतीने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार संपूर्ण कर्जमाफी करणे आवश्यक आहे.मात्र विखेंसारख्या जबाबदार मंत्र्याने कर्जबाजारीपणा वरून शेतकऱ्यांची खिल्ली उडवणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.विखे यांनी शेतकऱ्यांविरूध्द केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी.अन्यथा शेतकरी त्यांना माफ करणार नाहीत असा इशारा तरटे यांनी दिला आहे.

पालकमंत्री विखे यांचे वडील, तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे यांनी रांजणगाव मशीद परिसरातील शेतकऱ्यांना तेलबिया प्रकल्पाचे आमिष दाखवून जमीन लाटली आहे.या प्रकल्पाचे काय झाले.असा सवाल उपस्थित करतानाच विखे कुटुंबाने पारनेरमधील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचे तरटे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने